पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रात 70 किमी प्रतितास वेगाने वारे; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा


पुणे : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 24 तासांत अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

शुक्रवारी पुणे आणि नाशिकच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय 8 जिल्ह्यांना ऑरेंज, तर 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 50 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यासाठी रेड, तर सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवस घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

एकूणच, कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!