‘दृश्यम’लाही लाजवेल असा खुनाचा कट! प्रियकरासाठी पतीला सायनाइड पाजलं, 15 फूट खोल पुरलं; 2 वर्षांनी दिराच्या एका प्रश्नाने उघडलं रक्तरंजित रहस्य


जामनगर : गुजरातच्या जामनगरमधील एका थरारक हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. प्रेमसंबंध टिकवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून केल्याचा आरोप समोर आला आहे. दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पतीला संपवल्यानंतर त्याचा मृतदेह 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला. एवढंच नाही, तर हा गुन्हा लपवण्यासाठी पत्नीने तब्बल दोन वर्षे सासरच्या मंडळींना पती ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेल्याची बनावट कथा सांगत दिशाभूल केली. मात्र दिराने विचारलेल्या एका प्रश्नामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी पृथ्वी हिचे निलेश मनसुखभाई कचेटिया याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात पती जिग्नेश अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. नियोजनानुसार जिग्नेशला दारू पाजण्यात आली आणि त्यामध्ये विषारी सायनाइड मिसळण्यात आले. विषाचा परिणाम होताच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी जामनगरच्या दरेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात खोल खड्डा खणून मृतदेह गाडला.

हत्येनंतर संशय टाळण्यासाठी पृथ्वीने सासरच्या मंडळींसमोर खोट्यांचे जाळे विणले. जिग्नेश ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी गेला असून, ज्या कंपनीत तो काम करतो तेथे मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्यामुळे तो संपर्क करू शकत नसल्याचे ती सातत्याने सांगत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि जवळपास दोन वर्षे जिग्नेश परत येईल, या आशेवर दिवस काढले.

या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले ते जिग्नेशचा भाऊ अशोक स्वतः ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत असताना. त्याने वहिनी पृथ्वीकडे जिग्नेशच्या कंपनीचा पत्ता आणि संपर्काची माहिती मागितली. “मी तिथे गेल्यावर त्याला भेटून येतो,” असे सांगताच पृथ्वीची धांदल उडाली. ती वारंवार पत्ता देण्यास टाळाटाळ करू लागली. तिच्या संशयास्पद वर्तनामुळे अशोकला संशय आला. अखेर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पृथ्वी कोसळली आणि दोन वर्षांपूर्वी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

कबुलीनंतर पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यानुसार दरेड परिसरातील कारखान्यात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत उत्खनन केले. सुमारे 12 ते 15 फूट खोल खड्ड्यातून जिग्नेशच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून, अवशेष डीएनए आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या प्रकरणी पृथ्वी आणि तिचा कथित प्रियकर निलेश मनसुखभाई कचेटिया यांच्याविरोधात हत्या, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लपवून ठेवलेले हे हत्याकांड अखेर उघडकीस आल्याने जामनगरसह संपूर्ण गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिस या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!