‘फेक टीचर’चा महाघोटाळा! बनावट नियुक्ती, खोटा शालार्थ आयडी, न्यायालयालाही लावला गंडा; जळगावात पाच जणांवर गुन्हा


जळगाव : राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद अद्याप उमटत असतानाच जळगावातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आणखी एक मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. बनावट मान्यता आदेश तयार करून एका व्यक्तीची उपशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यासाठी खोटा शालार्थ आयडी मिळवण्यात आला आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे न्यायालयातून वेतनश्रेणीचे आदेशही मिळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची सुरुवात माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे झाली. चौकशीत समोर आले की, अंजुमन-ए-तालिमूल मुस्लेमीन संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सय्यद अमरुल्लाह सय्यद चांद कासार यांची 10 जुलै 2018 रोजी विनाअनुदानित उपशिक्षक म्हणून नियुक्ती दाखवण्यात आली. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2018 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या कथित मान्यता आदेशाच्या आधारे त्यांना बदली मान्यता मिळाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, हा आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत आवक-जावक नोंदवहीतच नसल्याचे स्पष्ट झाल्याने तो पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले.

तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली. बनावट मान्यता आदेशाच्या आधारे संबंधित व्यक्तीला शालार्थ आयडी मिळवून देण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 301/2022 दाखल करून शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रांवर विश्वास ठेवत वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधी आदेश दिल्यानंतर शासनाकडून थकीत वेतनापोटी 6 लाख 23 हजार 970 रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. त्यामुळे केवळ शासनाचीच नव्हे तर उच्च न्यायालयाचीही दिशाभूल झाल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे.

या प्रकरणी डॉ. करीम सालार यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह सय्यद चांद कासार, संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर, तत्कालीन मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक राजेंद्र रघुनाथ चौधरी आणि भडगाव येथील उर्दू शाळेतील उपशिक्षक शेख जहीर शेख सलाउद्दीन यांचा समावेश आहे. सर्व संशयितांना अटकपूर्व जामीन मिळाला असून आर्थिक गुन्हे शाखा या संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहे.

दरम्यान, राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे. बनावट आदेश तयार करण्यापासून शासकीय यंत्रणेला गंडा घालणे, न्यायालयातून आदेश मिळवणे आणि सरकारी निधी उचलणे, या संपूर्ण साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून या प्रकरणातून शिक्षण विभागातील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!