चहात विष नव्हे, हळद-लवंग टाकत होते’; व्हायरल प्रकरणात ज्योती गुप्तांचा मोठा खुलासा, पतीवरच केले गंभीर आरोप

पुणे : चहामध्ये विषारी केमिकल मिसळून पती आणि सासू-सासऱ्यांना हळूहळू विष देत असल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या सरकारी रुग्णालयातील लॅब टेक्निशियन ज्योती गुप्ता यांनी अखेर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे देशभरात खळबळ उडाल्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. उलट, पती हिमांश गुप्ता यांच्या सांगण्यावरूनच आपण चहात हळद आणि लवंग मिसळत असल्याचा दावा करत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
ज्योती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, चहात कोणतेही विषारी केमिकल टाकण्यात आले नव्हते. पतीने स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून ‘सासूला मुठीत ठेवण्याचे उपाय’ सांगणारे काही व्हिडीओ पाठवले होते. त्या व्हिडीओंमध्ये हळद आणि लवंग वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पतीच्या सांगण्यावर विश्वास ठेवूनच आपण चहात हे दोन पदार्थ टाकत होतो. स्वयंपाकघरात गुप्त कॅमेरे बसवले आहेत किंवा आपले चित्रीकरण सुरू आहे, याची कल्पनाही नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर हिमांश गुप्ता यांनी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांनी घरात लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यातील व्हिडीओ पोलिसांकडे सुपूर्द केले. या व्हिडीओंमध्ये ज्योती चहा बनवताना एका छोट्या डबीतून काही पदार्थ चहात मिसळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बिघडत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, या सर्व आरोपांमागे वेगळाच हेतू असल्याचा दावा ज्योती यांनी केला आहे.


ज्योती यांनी सांगितले की, व्हायरल करण्यात आलेले व्हिडीओ सुमारे दीड वर्षांपूर्वीचे आहेत. जर हे व्हिडीओ खरोखरच महत्त्वाचे पुरावे होते, तर पोलिस तपासाच्या सुरुवातीलाच किंवा घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान ते का सादर करण्यात आले नाहीत? आता अचानक ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी त्यांनी पतीच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही गंभीर आरोप केले. लग्नानंतर पतीने बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे स्वतः कबूल केले होते. त्या तरुणीशीच लग्न करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. सासूलाही त्याच मुलीला सून म्हणून स्वीकारायचे होते. त्यामुळे मला या कुटुंबातून दूर करण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
चहाच्या माध्यमातून विषप्रयोग झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत ज्योती यांनी या प्रकरणाची वैज्ञानिक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. चहात नेमके काय होते, याची तपास यंत्रणांनी प्रयोगशाळेत तपासणी करावी. सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण याबाबतची माहिती यापूर्वीच पोलिसांना दिली असून तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून, व्हायरल व्हिडीओ, दोन्ही बाजूंचे दावे आणि पोलिस तपास यामुळे या गाजलेल्या प्रकरणातील सत्य नेमके काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या आरोप-प्रत्यारोपांमागील वास्तव स्पष्ट होणार आहे.