१६ लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर, पण खात्यात कर्जमाफीचे पैसे कधी? सरकारच्या एका अटीने वाढली चिंता


मुंबई : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी ई-केवायसी अनिवार्य केल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महायुती सरकारने राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात ५३३ शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सरकारने १६ लाख ९६ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादीही प्रसिद्ध केली.

मात्र, कर्जमाफीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाने ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत यादीतील केवळ ३ लाख ३३ हजार ८६७ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे सध्या फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे, १३ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने त्यांची कर्जमाफीची रक्कम अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या अटीमुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची आठवणही ताजी झाली आहे. त्या योजनेतही ई-केवायसी आणि पडताळणीमुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे कर्जमाफी योजनेतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!