‘इन्स्टा’वर जाहिरात दिसली, टॉय कार मागवली अन्…; पुणेकर महिलेसोबत घडलं धक्कादायक

पुणे : सोशल मीडियावरील आकर्षक आणि स्वस्त दरातील जाहिरातींना भुलून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशाच एका प्रकारात इन्स्टाग्रामवरील लहान मुलांच्या टॉय कारच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणाऱ्या महिलेची तब्बल 3 लाख 71 हजार 127 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस वसाहत परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने 17 ते 24 जुलैदरम्यान इन्स्टाग्रामवर कमी किमतीत टॉय कार उपलब्ध असल्याची जाहिरात पाहिली. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपींनी टॉय कार घरपोच पाठवण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला नोंदणी शुल्क म्हणून 500 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वाहतूक खर्च, विमा, प्रक्रिया शुल्क आणि नंतर पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवत आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन माध्यमातून पैसे जमा करण्यास भाग पाडले. टॉय कार मिळेल या विश्वासाने महिलेने वारंवार पैसे भरले. मात्र, पैसे भरूनही ना टॉय कार मिळाली, ना भरलेली रक्कम परत आली.


यानंतर आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच राहिल्याने महिलेला संशय आला. चौकशी केल्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिस संबंधित मोबाईल क्रमांक, बँक व्यवहार, इन्स्टाग्राम खाते आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहेत. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील आकर्षक आणि स्वस्त जाहिरातींना बळी पडू नये, कोणतेही ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.