‘शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही’; दत्ता भरणे यांची मोठी घोषणा, खतासाठ्याबाबत दिली महत्त्वाची माहिती


मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही, असे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

दत्ता भरणे म्हणाले, राज्यात खतांची कोणतीही टंचाई नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा साठा उपलब्ध असून, वितरणही सुरळीत सुरू आहे. काही भागात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसला तरी पुढील काळात राज्यभर समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यंदाच्या खरीप हंगामात मका आणि सूर्यफूल पिकांची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तसेच अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमाफी योजना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. निकृष्ट बियाण्यांबाबत आतापर्यंत 85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित कंपन्यांना बियाणे बदलण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने जून महिना जवळपास कोरडा गेला होता. मात्र जुलैमध्ये राज्यात अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला. कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी योग्य वेळेत पेरण्या केल्यामुळे सध्या राज्यात 84 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, काही भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उर्वरित भागांतील पेरण्यांनाही गती मिळेल आणि खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!