मोदी-तटकरे भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण; पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये जाणार का?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याने दिल्लीतील या सलग बैठकींनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी ही विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि विविध प्रशासकीय विषयांवर झालेली सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी सांगितले.

तथापि, या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.


यापूर्वी शरद पवार यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या शक्यतांना स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, दिल्लीतील वाढलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे आणि सलग चर्चांमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना पुन्हा चालना मिळाली आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.