पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस! धरणांमध्ये झपाट्याने वाढला जलसाठा; पाहा कोणते धरण किती टक्के भरले?

पुणे : जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पुणे महानगरपालिकेला शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र, जुलैमध्ये मुसळधार पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट जवळपास दूर झाले असून, पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
28 जुलै 2026 च्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यातील कळमोडी, आंद्रा, खडकवासला आणि वीर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांतून नदीपात्रात नियंत्रित पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सोलापूरसाठी महत्त्वाचे असलेले उजनी धरण देखील 99.78 टक्के भरले असून, त्यामध्ये 53.46 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सध्या 91.47 टक्के म्हणजेच 26.66 टीएमसी पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील भामा आसखेड धरण 98.23 टक्के, पानशेत 96.47 टक्के, वरसगाव 89.90 टक्के आणि टेमघर 77.98 टक्के भरले आहे.


पिंपरी-चिंचवडलाही दिलासा
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95.54 टक्के भरले असून, त्यात 8.13 टीएमसी पाणीसाठा आहे. याशिवाय घोड (97.78%), येडगाव (97.42%), चासकमान (97.33%), डिंभे (91.54%), भाटघर (85.07%) आणि मुळशी (86.58%) धरणांमधील पाणीसाठाही समाधानकारक आहे. तर माणिकडोह (51.01%) आणि पिंपळगाव जोगे (42.43%) या धरणांमध्येही पाणीसाठा वाढत आहे.
धरण क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठ्याची स्थिती अधिक सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.