प्रेम, लग्न आणि विश्वासघाताचा आरोप! महिला वकिलीची धक्कादायक तक्रार; पोलीस हवालदारावर लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूकसह गंभीर गुन्हा


बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात एका पोलीस हवालदाराविरोधात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यामुळे पोलीस दलासह कायदेवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाचे वारंवार आश्वासन देत महिला वकिलीसोबत सहजीवन ठेवणे, तिचे लैंगिक शोषण करणे, लाखो रुपयांचा आर्थिक लाभ घेणे, मुलीचा स्वीकार करण्यास नकार देणे आणि तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप संबंधित हवालदारावर करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी रमेश मोहन जाधव हे पोलीस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत असून त्यांची सध्या पुण्यातील खडकी येथे नियुक्ती आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 297/2026 नुसार त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 81, 318, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला व्यवसायाने वकील असून, 2024 मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपीची तिच्याशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्रीच्या माध्यमातून संवाद वाढला. त्यानंतर आरोपीने आपण पत्नीपासून वेगळे राहत असल्याचे सांगून लवकरच कायदेशीर विवाह करू, असे वारंवार आश्वासन दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या आश्वासनांवर विश्वास ठेवून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

फिर्यादीनुसार, 28 डिसेंबर 2024 रोजी आरोपी बारामती येथे आला. त्याने आर्थिक अडचणीचे कारण सांगत फिर्यादीकडून ₹40 हजार घेतल्याचा आरोप आहे. त्याच दिवशी बारामतीतील एका लॉजमध्ये नेऊन विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी प्रथम शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर आरोपीने नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी भेट दिली. विवाहाबाबत चर्चा करून कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. पुढे एका मंदिरात गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घालत “आजपासून तू माझी पत्नी आहेस” असे सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. एवढेच नव्हे तर जेऊर आणि निंभोरे परिसरात विविध व्यक्तींशी तिचा पत्नी म्हणून परिचय करून दिला गेला. त्यामुळे विवाह निश्चित झाल्याचा पूर्ण विश्वास बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सहजीवनादरम्यान महिला गर्भवती राहिली. मात्र त्यानंतर आरोपीने जबाबदारी टाळण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. गर्भधारणेदरम्यान आवश्यक खर्च, उपचार किंवा मानसिक आधार न देता उलट त्रास दिला गेल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. संबंधित मुलगी आरोपीपासून झाल्याचा दावा करत असतानाही आरोपीने पितृत्व स्वीकारण्यास नकार दिला. तसेच मुलीच्या संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीने आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, आरोपीने वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून तसेच तिच्या नातेवाईकांकडून रोख आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठी रक्कम घेतली. ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर दबाव टाकणे, तडजोडीसाठी धमक्या देणे आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक आणि दस्तऐवजीय पुराव्यांची व्यापक पडताळणी सुरू केली आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), व्हॉट्सअॅप संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील उपलब्ध दृश्यफीत, वैद्यकीय व प्रसूतीसंबंधी कागदपत्रे, बँक व्यवहारांची माहिती तसेच साक्षीदारांचे जबाब यांचा तपासात समावेश करण्यात येणार आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व उपलब्ध पुरावे आणि न्यायवैद्यकीय तपासणीच्या आधारे प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला जात आहे. दरम्यान, कायद्यानुसार पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या वृत्तातील सर्व आरोप हे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर आधारित असून, त्यांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!