1 ऑगस्टची तारीख आताच लक्षात ठेवा! तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे 5 मोठे बदल; जाणून घ्या

पुणे : जुलै महिना संपत आला असून 1 ऑगस्ट 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय बदल लागू होणार आहेत. एलपीजी सिलिंडरच्या दरांपासून रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग, जीएसटी नियम, आयकर रिटर्न (ITR) आणि बँकिंग शुल्कांपर्यंत अनेक बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपूर्वी हे बदल जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ITR भरणाऱ्यांसाठी शेवटची संधी
पगारदार करदात्यांसाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे, तर इतर पात्र करदात्यांसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. निर्धारित मुदतीनंतर ITR भरल्यास ₹5,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते. तसेच विलंबाने रिटर्न भरल्यास काही करसवलतींचा लाभ घेण्यावरही परिणाम होऊ शकतो.

GST नियमांमध्ये मोठे बदल
1 ऑगस्टपासून व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योगांसाठी जीएसटी व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. ‘बिल-टू-शिप-टू’ व्यवहारांमध्ये ‘शिप-टू GSTIN’ देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ई-वे बिल प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी GSTIN आणि राज्य कोडची स्वयंचलित पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय व्यापाऱ्यांना स्वेच्छेने ई-वे बिल बंद करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.


रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये नवा नियम
भारतीय रेल्वे 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल करणार आहे. नवीन नियमानुसार तिकीट काउंटरवर टोकन देण्याची वेळ आणि तत्काळ बुकिंग सुरू होण्याची वेळ एकाच वेळी ठेवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी होण्यास आणि प्रवाशांना अधिक सुलभ सेवा मिळण्यास मदत होईल.
LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर होणार
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी घरगुती 14 किलो आणि व्यावसायिक 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दर वाढल्यास गृहिणींच्या मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो.
विमान प्रवास महागणार की स्वस्त?
1 ऑगस्ट रोजी विमान इंधन दरांमध्येही बदल जाहीर होणार आहेत. एटीएफ महाग झाल्यास विमान कंपन्या तिकीट दर वाढवू शकतात, तर दर कमी झाल्यास हवाई प्रवाशांना स्वस्त तिकिटांचा लाभ मिळू शकतो.
बँकिंग सेवांमध्येही बदल
1 ऑगस्टपासून काही बँकांच्या सेवा शुल्कात बदल होणार आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस अलर्ट शुल्कात बदल करणार असून आता प्रति एसएमएस 30 पैसे शुल्क आकारले जाणार आहे (निश्चित मासिक मर्यादेनुसार). याशिवाय डेबिट कार्ड देखभाल शुल्क आणि इतर सेवा शुल्कांमध्येही बदल होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आपल्या संबंधित बँकेकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी, प्रवासी आणि गृहिणींवर होणार असल्याने प्रत्येकाने या नव्या नियमांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.