मोठी बातमी! भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला; परिसरात एकच खळबळ

पंजाब : पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी बीअरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब तयार केला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. हा बॉम्ब कार्यालयाच्या भिंतीवर आदळून फुटल्याने आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. संगरूरचे पोलिस अधीक्षक (SP) दविंदर अत्री यांनी सांगितले की, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, संगरूरमधील भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून, गेल्या महिन्यात एका भाजप नेत्याच्या दवाखान्यावरही पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना समोर आली होती.
त्यामुळे या ताज्या हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.