पार्थ पवारांच्या साखरपुड्याची जोरदार तयारी! पुण्यात ‘या’ दिवशी रंगणार शाही सोहळा; कोणकोणते दिग्गज राहणार उपस्थित?

पुणे : पवार कुटुंबात पुन्हा एकदा विवाहसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाहानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 29 जुलै रोजी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा खास सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, कार्यक्रम ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, त्या हॉटेलचे नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या साखरपुड्यासाठी पवार कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व आमदार आणि खासदारांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही मोजक्या माजी आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, या कौटुंबिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणकोणते राजकीय दिग्गज उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हा साखरपुडा अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, पवार कुटुंबीय, नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मिळून सुमारे 200 ते 250 पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आगामी विवाहापूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.