लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिलं मोठं अपडेट; म्हणाल्या, निर्णय मुख्यमंत्र्यांचा

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, यामुळे अद्याप ई-केवायसी पूर्ण न झालेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ज्या महिलांची ई-केवायसी काही कारणांमुळे प्रलंबित राहिली होती, त्यांना आता पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवणे अधिक सोपे होणार आहे.

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1,500 जमा केले जातात. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा लाभ ₹2,100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वाढीव रक्कम नेमकी कधीपासून मिळणार, याबाबत आदिती तटकरे यांनी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.


याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. योजनेतील आर्थिक लाभ वाढवायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.
त्यामुळे सध्या लाभार्थी महिलांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे. तर ₹2,100 च्या वाढीव हप्त्याबाबत सरकारचा अंतिम निर्णय कधी होतो, याकडे राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.