मोठी घडामोड! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधानांचा पहिलाच निर्णय; सोशल मीडिया प्रोफाइल बदलताच चर्चांना उधाण

नवी दिल्ली : नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया (एक्स) प्रोफाइलमध्ये बदल केला. यापूर्वी प्रोफाइलवर असलेला ‘Union Education Minister’ हा उल्लेख हटवून त्यांनी केवळ ‘Member of Parliament’ अशी नवी ओळख ठेवली. या बदलानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नीट पेपर लीक प्रकरणावरून गेल्या अनेक आठवड्यांपासून देशभरात संतापाची लाट उसळली होती. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण केले, तर संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्जमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आले.

या वाढत्या दबावानंतर सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शिष्टमंडळाने तीन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे आणि आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे या मागण्यांचा समावेश होता. चर्चेनंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.


राजीनाम्यानंतर सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये पुन्हा बैठक झाली. या बैठकीनंतर आंदोलनकर्त्यांनी तीनही मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवल्याचा दावा केला. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलनाचा शेवट विजयाच्या वातावरणात झाल्याचे चित्र दिसून आले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी याला “युवा शक्तीचा विजय” असे संबोधले, तर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करत आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, तसेच केंद्र सरकार पुढे कोणते निर्णय घेणार, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमधील तातडीच्या बदलामुळे राजीनाम्यानंतरच्या घडामोडींना आणखी वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.