उच्चशिक्षित नवरा-बायकोच निघाले ठग! पुण्यात आलिशान ऑफिस, श्रीमंतांना 88 कोटींचा गंडा; 3 वर्षांनी मिळालं कर्माचं फळ


पुणे : बाणेर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना तब्बल 88 कोटी रुपयांचा गंडा घालून दुबईला पसार झालेल्या मुख्य आरोपीला अखेर भारतात आणण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) प्रशासनाने प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अविनाश अर्जुन राठोड याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.

तपासानुसार, अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी बाणेर येथील ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी’ या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमा केली. मात्र, करारानुसार परतावा न देता त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एका फिर्यादीची 86.37 लाख रुपयांची, तर इतर शेकडो गुंतवणूकदारांची मिळून सुमारे 88 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हा उघडकीस येताच आरोपी पती-पत्नी परदेशात पळून गेले होते.

या प्रकरणी 20 एप्रिल 2023 रोजी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात आणि एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर आणि न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले. आरोपींचा पासपोर्टही निलंबित करण्यात आला. तरीही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने 4 जून 2026 रोजी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.

या नोटिशीच्या आधारे UAE प्रशासनाने दुबईमध्ये अविनाश राठोडला ताब्यात घेतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 जुलै 2026 रोजी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर पोहोचताच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी आणि अविनाश राठोडची पत्नी विशाखा राठोड अद्याप परदेशात फरार असून, तिला भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!