सुहागरात होण्याआधीच काळाचा डंख! नवरीच्या हातातील मेहंदी सुकायच्या आत नवरदेवाचा मृत्यू; जिवंत होईल म्हणून मांत्रिकाकडेही नेलं…

बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिओनाई गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्नाचा जल्लोष, नव्या संसाराची स्वप्ने आणि घरातील आनंदाचे वातावरण अवघ्या काही तासांत शोककळेत बदलले. लग्नाच्या पहिल्याच रात्री साप चावल्याने नवरदेव बबलू मौर्य याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नववधू रश्मीसह दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माहितीनुसार, रिओनाई गावातील रहिवासी बबलू मौर्य याचा विवाह गुन्नौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौहारपुरा गावातील रश्मी हिच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवारी दुपारी नववधूची पाठवणी झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी नवरीला घेऊन घरी परतली. घरी नव्या सुनेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. विविध धार्मिक विधी, नातेवाईकांची गर्दी आणि आनंदाचा उत्सव दिवसभर सुरू होता.

रात्री सर्व कार्यक्रम संपल्यानंतर बबलू झोपण्यासाठी गेला. त्याचवेळी त्याच्या मानेला विषारी सापाने दंश केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला सर्पदंशाची कुणालाही कल्पना आली नाही. मात्र सकाळी त्याची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते, सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाला.


मात्र कुटुंबीयांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनी बबलूला दुसऱ्या रुग्णालयात नेले, पण तेथील डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले. एवढ्यावरही नातेवाईकांनी हार मानली नाही. पोस्टमार्टम करण्यास नकार देत बबलू पुन्हा जिवंत होईल, या आशेने त्याला मांत्रिक आणि गारुड्याकडे नेण्यात आले. संध्याकाळपर्यंत विविध मंत्रोच्चार आणि पारंपरिक उपचार करण्यात आले, मात्र कोणताही चमत्कार घडला नाही.
या घटनेनंतर नववधू रश्मीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. हातातील मेहंदीचा रंगही फिका झाला नव्हता, तोच तिच्या आयुष्यात वैधव्याचे दुःख आले. लग्नासाठी सजलेले घर काही तासांतच शोकमय झाले. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला हा सोहळा अखेर अंत्यविधीच्या तयारीत बदलल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.