Pune News : 6 महिन्यांच्या बाळाला घरात झोपवून आई बाहेर गेली; परतताच दोन बोटं तुटलेली, चेहऱ्यावर खोल जखमा पाहून फोडला आक्रोश


पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरात शांतपणे झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याच्या हाताची दोन बोटे चावून तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात बाळाच्या चेहऱ्यावर आणि गालावरही गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तहसील कार्यालय परिसरात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे मजूर म्हणून काम करणारे सुनील खराडे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बुधवारी (22 जुलै) दुपारी सुमारे एकच्या सुमारास त्यांची पत्नी घराबाहेर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा नवीन सुनील खराडे घरात झोपलेला होता.

याचवेळी एका भटक्या कुत्र्याने घरात प्रवेश करून झोपलेल्या चिमुकल्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्याने बाळाच्या हाताची दोन बोटे चावून तोडली तसेच चेहरा आणि गालावरही गंभीर चावे घेतले. वेदनेने विव्हळलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच आई धावत घरात आली. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाळ आणि त्याच्याजवळ उभा असलेला कुत्रा पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

आईने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी कुत्र्याला हुसकावून लावत बाळाची सुटका केली आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून चिमुकल्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती लक्षपूर्वक तपासली जात आहे.

या घटनेनंतर जुन्नर शहरात संतापाची लाट उसळली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!