‘फडणवीसांना शुभेच्छा देण्यात व्यस्त, अजितदादांची जयंती राहिली प्रतीक्षेत?’; महापौरांच्या गैरहजेरीने पिंपरी-चिंचवड पालिकेत राजकीय स्फोट

पिंपरी-चिंचवड : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या शासकीय जयंतीनिमित्त राज्यभरात शासकीय स्तरावर अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यक्रम मात्र राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला. महापौर रवी लांडगे यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय जयंतीसाठी महापौर स्वतः उपस्थित राहतील, अशी अपेक्षा असतानाच त्यांची गैरहजेरी आणि त्यामागील कारणामुळे पालिकेच्या सभागृहात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला.
महापालिकेच्या सभागृहात सकाळपासूनच अधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शासकीय अभिवादन करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र ठरलेली वेळ उलटूनही महापौर कार्यक्रमस्थळी पोहोचले नाहीत. काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्याविना कार्यक्रम पूर्ण केला. याच क्षणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर शासकीय परंपरेचा अवमान केल्याचा आरोप करत जोरदार आक्षेप नोंदवला.

महापौर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्यादरम्यान त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते, अशी माहिती समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला. राष्ट्रवादीच्या मते, मुख्यमंत्री भेटीपेक्षा अजित पवार यांच्या पहिल्या शासकीय जयंतीला प्राधान्य मिळायला हवे होते. कार्यक्रमाची वेळ बदलता आली असती किंवा सकाळी लवकर आयोजन करता आले असते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आजचा दिवस आमच्यासाठी राजकीय नव्हे तर भावनिक आहे. शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्याच्या पहिल्या शासकीय जयंतीला महापौर अनुपस्थित राहणे योग्य नाही.” त्यांनी भाजपचे आमदार अमित गोरखे आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांच्यावरही निशाणा साधला.


घोडेकर यांनी पुढे सांगितले की, “जे काही महिन्यांपूर्वीपर्यंत अजित पवार यांना आपले राजकीय मार्गदर्शक म्हणत होते, त्यांनाच त्यांच्या पहिल्या शासकीय जयंतीला वेळ देता आला नाही. ही केवळ औपचारिक चूक नाही, तर भावनिक दुर्लक्ष आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, राज्यभर अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारे कार्यक्रम पार पडले. बारामतीतील स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि कुटुंबीयांनी अभिवादन केले. मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहण्यात आली.
अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. लाल दिव्याच्या गाड्यांचे आकर्षण, बारामतीतील दिवस, कुटुंबातील प्रसंग आणि रोहित पवार यांच्याशी असलेले अजितदादांचे नाते यांचा उल्लेख करत त्यांनी, “तू नाहीस हे मान्य होत नाही; अजूनही तुझी ‘काय बंधू’ ही हाक कानात घुमते,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पतीच्या जयंतीनिमित्त भावनिक संदेश प्रसिद्ध केला. “तुमचा वाढदिवस आज जयंती म्हणून साजरा करावा लागतो, हे वास्तव अजूनही स्वीकारता आलेले नाही. तुमचे विचार, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि तुमचा विश्वास माझ्या प्रत्येक निर्णयात कायम सोबत असेल,” असे त्यांनी नमूद केले.
यंदापासून २२ जुलै हा दिवस राज्य सरकारने अजित पवार यांचा अधिकृत शासकीय जयंती दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे राज्यभर शासकीय पातळीवर अभिवादनाचे कार्यक्रम झाले. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेला वाद हा दिवसाचा सर्वात चर्चेचा राजकीय मुद्दा ठरला. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल, भावना आणि राजकीय प्राधान्यक्रम यांचा संघर्ष उघडपणे समोर आल्याने या घटनेची चर्चा राज्यभर रंगली.
