आईच्या कुशीतून क्षणात मृत्यूच्या जबड्यात! पहाटे गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने ५ वर्षांच्या भाग्यश्रीला उचललं; शिरूरच्या या घटनेने महाराष्ट्र हादरला


पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात बुधवारी पहाटे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. कुटुंबीयांसोबत गोठ्यात झोपलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने थेट हल्ला करत तिला जबड्यात पकडून उसाच्या शेतात नेले. जीवाच्या आकांताने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी पाठलाग केला, मात्र गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून वनविभागाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

मृत मुलीचे नाव भाग्यश्री संदीप वारे (वय ५) असे आहे. तिचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करोडी असून कुटुंब रोजगारासाठी काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे वास्तव्यास होते. ते मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात राहात होते.

मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीनंतर सर्वजण गाढ झोपेत असताना बिबट्याने थेट गोठ्यात प्रवेश केला. क्षणार्धात त्याने भाग्यश्रीला उचलून बाहेर नेले. मुलीच्या किंकाळ्यांमुळे आई-वडील आणि इतर नातेवाईक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. आवाज ऐकून गावातील नागरिकही घटनास्थळी पोहोचले. मात्र बिबट्याने मुलीला जवळच्या उसाच्या शेतात नेले होते.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी, पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने उसाच्या शेतात भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर पिंपळसुटी आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी केली आहे. “यापूर्वीही या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. अनेकदा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. आज एका निष्पाप मुलीचा जीव गेला, याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत खडे, स्मिता राजहंस आणि तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पुन्हा सहा पिंजरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची पाहणी केली जाणार असून रात्री विशेष गस्तही वाढवण्यात आली आहे. बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

गेल्या काही महिन्यांत शिरूरसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऊस शेती, मानवी वस्त्यांच्या जवळ वाढलेला वन्यजीवांचा वावर आणि अन्नाच्या शोधात गावांकडे होणारी त्यांची हालचाल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर बनत चालल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.

भाग्यश्रीच्या मृत्यूने पिंपळसुटी गाव शोकसागरात बुडाले आहे. पहाटेच्या काही क्षणांत एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेला, तर संपूर्ण गावाला असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे. आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!