शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर भाजपची नवी अट? एनडीए प्रवेशासाठी ‘हा’ फॉर्म्युला चर्चेत; दिल्लीतील हालचालींना वेग

मुंबई : महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका चर्चेने वेग घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांमध्ये आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवार गटाला स्पष्ट संदेश दिला असून, स्वतंत्र पक्ष म्हणून नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येऊनच एनडीएत सहभागी व्हावे, अशी भूमिका मांडल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवर अनेकदा चर्चा झाली. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच विलिनीकरणाचा विषय संपल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी मानली जात होती. मात्र, अलीकडील राजकीय भेटींनी पुन्हा एकदा या चर्चांना हवा मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेतली. या भेटींमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी त्यानंतर शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला.

दुसरीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या घडामोडीनंतर केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. या नव्या गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. अर्थ खात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजप स्वतंत्रपणे शरद पवार गटाला एनडीएमध्ये सामावून घेण्यास इच्छुक नसून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यालाच प्राधान्य देत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रात आणि राज्यात प्रत्येकी एका मंत्रिपदाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची शरद पवार गटाला सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या राजकीय समीकरणासमोर अंतर्गत मतभेद हे मोठे आव्हान ठरू शकतात.
दरम्यान, महायुतीचे आमदार रवी राणा यांनी या चर्चेत आणखी भर घालत मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, “राजकारणात काहीही अशक्य नसते. येत्या पंधरा दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची असेल,” असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या सूत्रांच्या माहितींवर आणि राजकीय घडामोडींवर आधारित असल्याचे स्पष्ट आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तार, एनडीएतील संभाव्य बदल आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दिल्ली आणि मुंबईतील राजकीय हालचालींमधून पुढील समीकरणे नेमकी कशी आकार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.