धक्कादायक! लग्नाच्या मंडपात नेमकं काय घडलं? १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत, पुण्यात खळबळ

पुणे : ताडीवाला रस्ता परिसरात एका विवाह सोहळ्यानंतर मंडप उतरवण्याचे काम सुरू असताना १६ वर्षीय मुलाचा विजेचा धक्कालागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता येथील मारुती मंदिराजवळ आयोजित हळदी समारंभानंतर ३ जुलै रोजी रात्री मंडप काढण्याचे काम सुरू होते. यावेळी यश प्रितियानी (वय १६) हा मुलगा काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.
धक्का बसताच यश जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर यशचे मामा धनंजय कृष्णा मापुसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंडप व्यावसायिक आसिफ कासम सय्यद याच्याविरुद्ध निष्काळजीपणा तसेच बालमजुरीसंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अल्पवयीन मुलांकडून धोकादायक कामे करून घेतली जात असल्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.