आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाबाबत पडद्यामागे काय घडतंय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार का, यावर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरी विविध भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट ही केवळ योगायोग नव्हती, तर ती पूर्वनियोजित होती, असे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारमधील काही लोकांकडून शरद पवार गटातील खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसच्या काही खासदारांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावले असले, तरी राजकीय घडामोडींमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाबाबत भाजपने स्पष्ट अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन पक्षाचे विलिनीकरण झाल्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेश शक्य होईल, असा संदेश भाजपकडून देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याचदरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार गटाने मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे. ५० टक्के जागांच्या फॉर्म्युल्यावर विचार होऊ शकतो, असे संकेत भाजपला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच INDIA आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून सामूहिक भूमिका निश्चित केली जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेत शरद पवार गटाचे ८ खासदार आणि राज्यसभेत १ खासदार असल्याने, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांच्या पाठिंब्याला महत्त्व असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शरद पवार पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.