MPSC ऑनलाइन परीक्षेबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत ‘हे’ ठरलं


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत CBT परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ती ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि संबंधित यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे ऑगस्ट 2027 पर्यंत MPSC च्या सर्व परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जातील, तर त्यानंतर CBT प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल. यासंदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सुरक्षित आणि पारदर्शक निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. परीक्षा वेळेत व्हाव्यात, निकाल वेळेत लागावेत, यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. मात्र, एका प्रणालीतून दुसऱ्या प्रणालीकडे जाताना विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनाही पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे CBT परीक्षा पद्धती ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात यावी आणि तोपर्यंत विद्यमान पद्धतीनेच परीक्षा घेतल्या जाव्यात.”

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध सुधारणा उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घेतले जातील, असेही स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!