हडपसर ते यवत उन्नत मार्गासह जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या मार्गांच्या कामांचे १८ जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन; आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांची माहिती

उरुळीकांचन : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे पुणे-शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर-यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री भोसले यांनी सांगितले की, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी केली जाणार आहे. हडपसर-यवत उन्नत मार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठकही घेतली जाणार आहे. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर (माऊली) कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील शेळके, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे-शिरूर प्रकल्पासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली. बैठकीत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी तीनही प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण केले.
हडपसर-यवत उन्नत मार्गासह जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली.