“‘विठ्ठला… आमचे दादा परत पाठव!’ आषाढी वारीत भावनांचा महापूर; एका फलकाने अजितदादांच्या आठवणी पुन्हा जाग्या”

लोणंद : आषाढी वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि भावनांचा महासागर. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले असताना यंदाच्या वारीत लोणंद येथे घडलेला एक प्रसंग राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात पुढे सरकणाऱ्या दिंडीमध्ये एका महिला वारकऱ्याच्या हातात दिसलेला दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटो असलेला फलक अनेकांच्या नजरा खिळवून गेला. त्या फलकावर लिहिलेला संदेश – “एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला… परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला” – पाहताच अनेक वारकरी भावूक झाले. काहींनी थांबून त्या फलकासोबत छायाचित्रे काढली, तर अनेकांनी हात जोडून विठ्ठलाचे नामस्मरण केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भावनिक पोकळी अजूनही कायम असल्याचे या प्रसंगातून पुन्हा एकदा दिसून आले. महिला वारकरी हातात फलक घेऊन शांतपणे दिंडीत सहभागी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि फलकावरील संदेशामुळे परिसरातील वातावरण काही काळ गंभीर झाले. हा फोटो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सअॅपवर हजारो जणांनी तो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या वारीत वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रमही राबवले जात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देहूपासून पंढरपूरपर्यंत अनेक ठिकाणी आरोग्य सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत. वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, पायांची मालिश, प्राथमिक उपचार तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोठ्या संख्येने स्वयंसेवक या सेवेत सहभागी झाले असून, प्रवासादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “दादा असते तर आज वारकऱ्यांच्या सेवेत सर्वांत पुढे दिसले असते”, “लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे होता”, “विठ्ठला, आमचे दादा परत पाठव” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. वारीत सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांची लोकाभिमुख शैली आणि जनसंपर्काची आठवण सांगितली.

दुसरीकडे, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीत उत्साहात दाखल झाला आहे. शारदा प्रांगण येथे पालखीचा मुक्काम असून दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. टाळ-मृदंग, अभंग, भजन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
वारीतील या एका फलकाने केवळ एका नेत्याच्या आठवणी जागवल्या नाहीत, तर जनतेच्या मनात आजही जिवंत असलेल्या भावनिक नात्याचे दर्शन घडवले. त्यामुळे लोणंदमध्ये घडलेला हा प्रसंग यंदाच्या आषाढी वारीतील सर्वाधिक चर्चेचा आणि भावनिक क्षण ठरला आहे.