प्रेमाच्या आहारी गेलेल्या पत्नीचा थरकाप उडवणारा कट! नवऱ्याची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; ११ महिन्यांनी उलगडलं ऐरोलीतील गूढ


मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाचा तब्बल ११ महिन्यांनंतर उलगडा झाला असून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुन्ह्याचा कोणताही मागमूस लागू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून ते ऑटो रिक्षातून गवळीदेव डोंगर परिसरात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या तपासातून या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोलीत राहणारी सुनिता कुशवाहा हिचे राहुल प्रजापती नावाच्या रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना पती बळीराम कुशवाहा विरोध करत असल्याने तो दोघांच्या नात्यातील अडथळा ठरत होता. त्यामुळे बळीरामचा कायमचा काटा काढण्याचा कट दोघांनी मिळून रचल्याचा आरोप आहे.

९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुनिताने आपल्या मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवले. त्यानंतर बळीराम झोपल्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. हत्या झाल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरण्यात आला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले. त्यानंतर राहुल प्रजापतीच्या ऑटो रिक्षामध्ये हे तुकडे भरून गवळीदेव डोंगर परिसरात नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

हत्येनंतर सुनिताने पती बेपत्ता झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी बळीराम हरवल्याची माहिती नातेवाईकांनाही देण्यात आली. सुरुवातीला पोलिसांकडे बेपत्ता व्यक्ती म्हणून नोंद झाली होती. मात्र तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद बाबी आढळल्या. मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि आरोपींच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे सुनिता आणि राहुल यांच्यावर संशय अधिक गडद झाला.

पोलिसांनी दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून विविध पुरावे गोळा केले.

या प्रकरणात पोलिसांनी सुनिता कुशवाहा आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती या दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली असून या हत्येमागे आणखी कोणी सहभागी होते का, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतरांची मदत घेण्यात आली होती का, तसेच गुन्ह्याच्या नियोजनाबाबत आणखी कोणते धागेदोरे मिळतात का, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे ऐरोलीसह संपूर्ण नवी मुंबई हादरली असून, प्रेमसंबंधातून पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!