घरच्यांच्या विरोधात केलं प्रेमविवाह; पतीचं 50 जणांसोबत ‘नको ते’ कांड, तुरुंगातून ‘व्हिडिओ कॉल’वर झाला घटस्फोट; नेमकं घडलं काय?


पुणे : पुण्यातील एका अनोख्या घटस्फोट प्रकरणात तुरुंगात असलेल्या पतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर राहून पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला संमती दिली. जिल्हा न्यायाधीश महेंद्र जाधव यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष विवाह कायद्यानुसार घटस्फोट मंजूर केला. त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या प्रेमविवाहाचा 12 वर्षांनंतर न्यायालयीन प्रक्रियेतून शेवट झाला.

या प्रकरणातील 35 वर्षीय पत्नी आणि 37 वर्षीय पती यांनी 2014 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत प्रेमविवाह केला होता. या विवाहाला पतीच्या कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी लग्न केले. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पतीने नोकरी सोडून शेअर बाजारासंदर्भात मार्गदर्शन करणारे वर्ग सुरू केले.

पत्नीच्या म्हणण्यानुसार, व्यवसाय सुरू झाल्यानंतर पतीची एका महिला सहकाऱ्याशी जवळीक वाढली. तसेच तिच्या परवानगीशिवाय संबंधित महिलेच्या बँक खात्यात मोठ्या रकमेची आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली. याला विरोध केल्यानंतर पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. अखेर 2024 मध्ये पत्नीला घर सोडावे लागले.

दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सततच्या मानसिक छळामुळे पत्नीने ॲड. सतीश धोका यांच्यामार्फत विशेष विवाह कायद्याच्या कलम 27 अंतर्गत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान पतीला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याने पत्नीच्या घटस्फोटाच्या मागणीला संमती दिली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेत न्यायालयाने पत्नीचा छळ झाल्याचे नमूद करत घटस्फोट मंजूर केला. तसेच पती दीर्घकाळापासून कारागृहात असल्याची बाबही न्यायालयाने विचारात घेतली. अशाप्रकारे 12 वर्षांचा प्रेमविवाह न्यायालयाच्या आदेशाने अधिकृतपणे संपुष्टात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!