कोरोनाचा पुन्हा शिरकाव! देशात रुग्ण वाढले; महाराष्ट्रातील ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाची चिंता वाढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोविड-19 चे नवीन रुग्ण आढळून येत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आंध्र प्रदेशात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंबईतही नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

आंध्र प्रदेशात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, सध्या राज्यात काही सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कडप्पा येथील एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तपासणीनंतर त्यांच्या फुफ्फुसांवर संसर्गाचा गंभीर परिणाम झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुंबईतही कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक जान कुमार सानू याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ताप, तीव्र खोकला, अंगदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.