जगावं की मरावं? पुराच्या पाण्याने घेरलं घर; आईचं पार्थिव वाचवण्यासाठी घराचे पत्रे फोडून छतावर ठेवले, काळीज पिळवटून टाकणारी घटना


पालघर : मुंबई आणि उपनगरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्रासह काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. अशातच पालघरच्या केळवे रोड परिसरातून पुराच्या रौद्ररूपाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

घरात पुराचे पाणी शिरल्याने एका कुटुंबावर मोठे संकट ओढवले. मृतदेहासह तब्बल चार तास घराच्या छतावर बसून राहण्याची वेळ या कुटुंबावर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

केळवे रोड येथे राहणाऱ्या लिलका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचे निधन झाले.

सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचल्याने मृतदेह खांद्यावरून घरापर्यंत न्यावा लागला.

दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने काही वेळातच पुराचे पाणी घरात शिरले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला.

अखेर कुटुंबीयांनी घराच्या किचन भागातील छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टाने अनुसया लिलका यांचे पार्थिव छतावर नेले. मुसळधार पाऊस आणि घराला पडलेल्या पुराच्या वेढ्यात मृतदेह प्लास्टिकने झाकून ठेवत कुटुंबीयांनी तब्बल चार तास छतावर आसरा घेतला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेने पुराच्या परिस्थितीची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!