तिकीट घरी राहिलं तरी ट्रेन पकडता येणार! रेल्वेच्या या नियमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : रेल्वे प्रवास करताना सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे तिकीट घरी विसरण्याची. अनेकदा घाईत काऊंटरवरून घेतलेले आरक्षित तिकीट घरात राहते आणि प्रवासी चिंतेत पडतात. मात्र, अशा परिस्थितीत प्रवास थांबवण्याची गरज नाही. जर प्रवाशाने तिकीट आधीच खरेदी केले असेल आणि ते फक्त सोबत आणायला विसरले असेल, तर रेल्वेच्या नियमानुसार पडताळणी करून प्रवास सुरू ठेवता येतो.

रेल्वे आरक्षण केंद्रातून (PRS) काढलेले मूळ कागदी तिकीट विसरल्यास प्रवाशाने सर्वप्रथम ट्रेनमधील टीटीईला याची माहिती द्यावी. त्यानंतर प्रवाशाच्या कुटुंबातील व्यक्तीने किंवा संबंधित व्यक्तीने मूळ तिकीट बोर्डिंग स्टेशनवरील स्टेशन मास्टर किंवा रेल्वे अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागते. तिकीट आणि प्रवासाची माहिती तपासल्यानंतर अधिकृतता सिद्ध झाल्यास प्रवाशाला पुढील प्रवास करण्याची परवानगी दिली जाते.
मात्र, हा नियम विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नाही. ज्यांनी तिकीट खरेदी केलेले नाही आणि तरीही ट्रेनमध्ये प्रवास करताना आढळले, तर त्यांच्यावर रेल्वे नियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्रवाशाकडून तिकिटाचे भाडे आणि नियमानुसार दंड वसूल केला जाऊ शकतो.

ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अडचण तुलनेने कमी आहे. कारण IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवरून काढलेल्या ई-तिकिटाची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असते. टीटीईकडून पीएनआर क्रमांकाच्या माध्यमातून तिकिटाची पडताळणी केली जाऊ शकते. भारतीय रेल्वेने आरक्षण प्रणालीमध्ये डिजिटल सुविधा वाढवल्याने प्रवाशांना तिकीट तपासणी प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी तिकीट, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे आहे. कागदी तिकीट असल्यास ते सुरक्षित ठेवावे, तर ऑनलाइन तिकीट असल्यास पीएनआर क्रमांक आणि ओळखपत्र जवळ ठेवणे फायदेशीर ठरते. तिकीट विसरणे आणि विनातिकीट प्रवास करणे या दोन वेगळ्या गोष्टी असून, नियमांचे पालन केल्यास प्रवाशांना अनावश्यक त्रास टाळता येतो.