‘अजून एक गोड बातमी लवकरच कळेल’; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने पवार कुटुंबातील नव्या चर्चांना उधाण


पुणे : पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा लग्नसोहळ्याची धामधूम पाहायला मिळणार आहे. पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पुष्टी मिळाली आहे. यावर पार्थ पवार यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडे सध्या लग्न सुरू आहेत. पहिले युगेंद्र, जय, मग रेवती आणि आता पार्थ पवारचे आहे. पवारांच्या मुलांनी ठरवलं आहे, यंदा बँड वाजवायचा. अजून एक गोड बातमी आहे, ती तुम्हाला लवकरच कळेल, असे सांगत त्यांनी आणखी एका आनंदाच्या बातमीचे संकेत दिले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजना, कांद्याचा प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीवरही सरकारवर निशाणा साधला. “आठ लाख महिलांना केवायसीमधून काढण्यात आले. जनधन योजना आणि आधारकार्डची व्यवस्था असताना लाडक्या बहिणींचे केवायसी का पूर्ण होऊ शकले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी गुंतवणूक, रोजगार आणि सोन्याच्या वाढत्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच याबाबत सरकारने गांभीर्याने विचार केला आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

कांद्याच्या दराबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी बैठका सुरू आहेत. इगतपुरीतील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या प्रश्नावरही लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवर टीका करताना त्या म्हणाल्या, कर्जमाफीची घोषणा झाली आहे, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना लाभ मिळाला का, याची माहिती समोर यायला हवी.

यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या कामाचे कौतुक करत ते उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक खासदाराने सभागृहात आपले मत मांडले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!