“२० दिवसांत मुलगा अन् वडील दोघांनाही गमावलं”; राष्ट्रपतींकडे केतनच्या पित्याची न्यायासाठी आर्त साद


पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात आता भावनिक आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मुलासाठी न्यायाची मागणी केली आहे. “मी कोणत्याही राजकीय किंवा व्यावसायिक प्रभावाचा आधार घेत नाही; केवळ एका दुःखी पित्याच्या नात्याने न्याय मागत आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

केतनच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हत्येच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अवघ्या वीस दिवसांत केतनच्या आजोबांचे निधन झाले. नातवाच्या मृत्यूमुळे झालेला मानसिक आघात आणि सततची चिंता यामुळेच त्यांची प्रकृती खालावल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे अल्पावधीतच मुलगा आणि वडील अशा दोन जवळच्या व्यक्ती गमावल्याची वेदना विशाल अग्रवाल यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींकडे केलेल्या विनंतीत प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणी केली आहे. न्याय मिळण्यात होणारा विलंब कुटुंबाच्या जखमा अधिक खोल करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच, या अमानुष गुन्ह्यात दोषी ठरणाऱ्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबाच्या या आर्त हाकेमुळे गंभीर गुन्ह्यांतील न्यायप्रक्रिया अधिक वेगवान आणि संवेदनशील करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!