रात्रीच नव्हे, दिवसाही सुरू होता काळा धंदा; बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावर पनवेलच्या हायप्रोफाईल रॅकेटचा भांडाफोड, सहा महिलांची सुटका

पनवेल : नवी मुंबई गुन्हे शाखेने पनवेलमधील एका लॉजवर धाड टाकून कथित देहव्यापाराच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यामध्ये दोन बांगलादेशी महिलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांना काही दिवसांपासून ‘हॉटेल राहुल पार्क फॅमिली रेस्टॉरंट गार्डन बार अँड लॉजिंग-बोर्डिंग’मध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत होती. विशेष म्हणजे, येथे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाच्या वेळीसुद्धा महिलांची ये-जा सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने नियोजनबद्ध सापळा रचत एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. व्यवहार निश्चित होताच बाहेर तैनात पथकाने तातडीने लॉजवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान सहा महिलांची सुटका करण्यात आली. प्राथमिक चौकशीत काही महिलांना नोकरी व अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून, तर काहींना दबावाखाली या जाळ्यात ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांचे जबाब नोंदवून त्यांना वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी लॉज व्यवस्थापक गामा नंदू सोनकर, कॅशिअर दीपू उमेश यादव आणि वेटर प्रियंशु रविदास यादव यांना अटक करण्यात आली आहे. लॉजचा मालक रमेश शर्मा हा फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पनवेल शहर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटचे आर्थिक व्यवहार, परराज्यातील संपर्क, तसेच अन्य व्यक्तींचा सहभाग होता का याचाही तपास सुरू आहे. लॉजमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि जप्त कागदपत्रांची छाननी केली जात असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला नवे बळ मिळाले आहे.