पहाटे कात्रज चौकातील पीएमपी स्टॉपवर उभा होता तो! हातातली बॅग उघडताच पोलिसांना धक्का, आत सापडलं पावणेसहा कोटींचं…

पुणे : कात्रज चौकात गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ट्रॅव्हल बॅगेत तब्बल 5 कोटी 77 लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (MD) अंमली पदार्थ आढळून आले.

अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी कात्रज चौकात येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कात्रज चौकातील नवीन उड्डाणपुलाखालील पीएमपी बस थांब्याजवळ साध्या वेशात सापळा रचला.
गुरुवारी पहाटे एक तरुण हातात ट्रॅव्हल बॅग घेऊन संशयास्पद अवस्थेत त्या ठिकाणी आला. तो कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रशांत सुरेश सावंत (वय 38, रा. येरवडा, सध्या लोहगाव परिसर) असे आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, एवढ्या मोठ्या प्रमाणातील ड्रग्ज तो कोणाला पुरवणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अतुल क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील ड्रग्ज नेटवर्कविरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे.