पवार कुटुंबात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल? रोहित पवारांची वेगळी रणनीती चर्चेत; आजोबांच्या निर्णयांपासून वाढते अंतर?


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार कुटुंबातील अंतर्गत समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यातील संभाव्य राजकीय जवळीक, तसेच त्याचवेळी आमदार रोहित पवार यांच्या वाढत्या स्वतंत्र राजकीय हालचालींमुळे नव्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आगामी काळात पवार कुटुंबात आणखी एक राजकीय फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चर्चेला बुधवारी नवे कारण मिळाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल ३४ वर्षांनंतर विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी विविध पक्षांचे नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र या वेळी नातू आणि आमदार रोहित पवार उपस्थित नव्हते. ते डोंबिवलीतील एका मारहाण प्रकरणी पीडितांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा झाली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीएमध्ये राजकीय संवाद सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नव्या सत्तासमीकरणात काही वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र या प्रक्रियेत रोहित पवार यांचे नाव पुढे येत नसल्याने ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत रोहित पवार यांनी राज्यभर दौरे वाढवले असून विविध आंदोलने, शेतकरी प्रश्न आणि सरकारविरोधी कार्यक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत आहेत. युवकांमध्ये स्वतंत्र नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भविष्यात शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास रोहित पवार विचारधारेच्या मुद्द्यावर स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी राज्यभर संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांना संधी आणि जनसंपर्क वाढवण्यावर त्यांचा भर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप रोहित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!