फर्स्ट एसी डबा बनला ‘हनिमून सूट’; गुलाबाच्या पाकळ्या, फुगे अन् प्रेम संदेशाने संभाजीनगर-जालना रेल्वे प्रवास व्हायरल


जालना : रेल्वे प्रवासातील एका अनोख्या घटनेने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. संभाजीनगर ते जालना या प्रवासादरम्यान एका जोडप्यासाठी भारतीय रेल्वेच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात खास सजावट करण्यात आली होती. गुलाबाच्या पाकळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि ‘आय लव्ह यू’ संदेशाने सजवलेला हा डबा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातील एका कक्षाचे रूपांतर एखाद्या हनिमून रूमप्रमाणे करण्यात आल्याचे दिसत आहे. बेडवर मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या पाकळ्या पसरवण्यात आल्या होत्या. डब्याच्या भिंतीवर प्रेमाचा संदेश लावण्यात आला होता. तसेच संपूर्ण कक्ष फुग्यांनी सजवण्यात आला होता. रेल्वे धावत असतानाचा हा सजवलेला डबा पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी लग्नानंतरचा खास क्षण अशा वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल जोडप्याचे कौतुक केले. तर काहींनी रेल्वेच्या आरक्षित डब्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सजावट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित केला. सजावटीसाठी वापरण्यात आलेले फुगे, कागद आणि फुलांमुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो का, यावरही चर्चा सुरू झाली.

या व्हायरल व्हिडीओनंतर अनेकांनी भारतीय रेल्वेला टॅग करत आरक्षित डब्यात अशा प्रकारच्या खासगी सजावटीचे नियम काय आहेत, याबाबत माहिती देण्याची मागणी केली. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या डब्याला ‘सुहागरात एक्सप्रेस’ आणि ‘हनिमून ऑन व्हील्स’ अशी मजेशीर नावेही दिली.

दरम्यान, या प्रकरणावर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाने प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातील दोन्ही जागा आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे तो भाग पूर्णपणे खासगी वापरासाठी उपलब्ध होता. सजावटीमुळे रेल्वेच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही तसेच रेल्वेच्या नियमित कामकाजात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. अशा प्रकारच्या सजावटीवर स्पष्ट बंदी घालणारा कोणताही नियम नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सजावटीबाबत महाराष्ट्रातील ‘राहत रूम डेकोरेशन’ या कंपनीनेही माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जालना येथील एका जोडप्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संभाजीनगरहून जालना रेल्वे स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी प्रथम श्रेणी डब्यात सजावट करण्यात आली होती. कंपनीच्या पथकाने आधीच डबा सजवला होता आणि त्यानंतर जोडप्याने प्रवास केला.

कंपनीने सांगितले की, या सजावटीसाठी रेल्वेकडून कोणतीही विशेष परवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र, प्रवाशाने डब्यातील जागा आरक्षित केली असल्याने आणि रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याने कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रवासात खासगी आनंदाचे क्षण साजरे करण्याच्या नव्या पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या सजावटीसाठी स्पष्ट नियम असावेत का, यावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!