केतनच्या हत्येआधी सियाने काय-काय केलं? तपासात समोर आले धक्कादायक खुलासे


पुणे : रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिच्या डिजिटल हालचाली, सोशल मीडिया वापर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक बाबींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल हिचे केतन अग्रवाल यांच्याशी लग्न ठरलेले असतानाच तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत गुप्त विवाह झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येच्या काही महिन्यांपूर्वी हा विवाह झाल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांकडून पूर्वनियोजित कटाच्या दिशेने पाहिले जात आहे.

तपास यंत्रणांनी आरोपींच्या मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांतील व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि इंटरनेटवरील हालचालींचा तपास केला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन यांचा साखरपुडा झाला होता. त्याच काळात सिया आणि चेतन यांच्या गुप्त विवाहाबाबत माहिती समोर आली असून, या विवाहाची अचूक तारीख आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया आणि चेतन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

इन्स्टाग्रामवरील डिलीट फोटो-व्हिडिओंची होणार तपासणी

गुप्त विवाहाशी संबंधित पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांकडून विवाह प्रमाणपत्र, साक्षीदार आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. सियाच्या कॉलेजमधील काही मैत्रिणींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

याशिवाय सायबर तज्ज्ञ आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांवरील डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या डिजिटल पुराव्यांमधून प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोशल मीडिया, क्राईम कंटेंट किंवा इतर माध्यमांमधून गुन्ह्याची योजना आखण्यात आली होती का, या दिशेनेही सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!