दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर न्यायालयाचा दणका; दोघांना प्रत्येकी १० हजारांचा दंड, वाहतूक नियमभंग करणाऱ्या चालकास ५०० दंड

ओतूर : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात ओतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईला जुन्नर न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. न्यायालयाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या एका चालकास ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ओतूर येथील मोरे चौकात यश उल्हास हीरे (रा. ओतूर) हा दुचाकी निष्काळजीपणे चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील उदापूर गाव हद्दीतील बनकर फाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान राजाराम बाळू दुधवडे (रा. म्हसवंडी, ता. संगमनेर) आणि योगेश शिवाजी गोडे (रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर) हे दोघेही मद्याच्या अमलाखाली दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

या तिन्ही आरोपींना ६ जुलै २०२६ रोजी जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने यश हीरे यास ५०० रुपयांचा दंड, तर राजाराम दुधवडे आणि योगेश गोडे या दोघांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधातील विशेष मोहीम पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिला.