वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी! विशेष पास मिळवण्यासाठी फक्त ‘हे’ काम करा

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वारीसाठी प्रवास करणाऱ्या वाहनांना पथकर (टोल) माफी देण्याची घोषणा करण्यात आली असून, यासाठी विशेष पास आणि स्टिकर्सची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच वाहतूक, सुरक्षा आणि वारी मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

वारीसाठी वाहनांना टोलमाफी; पास कुठे मिळणार?
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या १० मानाच्या पालख्या, त्यांच्यासोबतची वाहने तसेच वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अखत्यारितील टोल नाक्यांवर पथकरातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केले आहे.

सन २०२६ च्या आषाढी वारीच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाविकांच्या सुविधा, वारी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांसाठी “आषाढी एकादशी २०२६”, वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद असलेले विशेष स्टिकर्स किंवा पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, संबंधित आरटीओ कार्यालये, पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पास ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाताना तसेच परतीच्या प्रवासातही वैध राहतील. ही सुविधा हलकी आणि जड अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी लागू असेल.
वारीदरम्यान टोल नाक्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय महामार्ग सुरक्षा पथकाकडून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जाणार असून, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद यांच्या माध्यमातूनही अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन गरजेनुसार अतिरिक्त एसटी बस सोडण्याच्या सूचनाही परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत.
याशिवाय राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिशादर्शक फलक उभारणे आणि सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
प्रत्येक २० ते २५ किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका, क्रेन आणि रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या एसटी बसेसना टोलमाफी लागू होत नाही, त्यांनाही संबंधित कूपन किंवा विशेष पासच्या माध्यमातून सवलत देण्यात येणार आहे.
याशिवाय जिल्हा आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखांमधून वारकरी, भाविक आणि पालखी सोहळ्यातील वाहनांसाठी मागणीनुसार टोलमाफीचे पास वितरित केले जाणार आहेत. टोलमाफीमुळे संबंधित टोल व्यवस्थापन कंपन्यांना होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन आणि हँडहेल्ड मशीनची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.