पँटच्या खिशात हात घातला अन् बीपी शून्यावर; विंचवाच्या दंशाने १२ वर्षीय मुलगा मृत्यूच्या दाढेत, डॉक्टरांनी वाचवले प्राण


चंद्रपूर : पावसाळ्यात घरात शिरणाऱ्या विषारी कीटकांमुळे जीव धोक्यात येऊ शकतो, याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे आली. खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशात हात घालताच विंचवाने दंश केल्याने १२ वर्षीय अनुप ईश्वर ढोणे हा मुलगा मृत्यूच्या दाढेत पोहोचला होता. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले.

चार दिवसांपूर्वी अनुपने घरातील पँटच्या खिशात हात घातला असता आत लपून बसलेल्या विंचवाने त्याच्या हाताला दंश केला. दंशानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. मात्र कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालय गाठण्याऐवजी सुरुवातीला गावातच घरगुती उपचार केले. त्यामुळे विषाचा परिणाम अधिक वाढत गेला आणि मुलाची अवस्था गंभीर बनली.

विष संपूर्ण शरीरात पसरल्याने अनुपचा रक्तदाब (बीपी) थेट शून्यावर आला. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून डॉ. आनंद बेंदले यांनी तातडीने उपचार सुरू केले. सलग तीन दिवस अतिदक्षता विभागात (ICU) उपचार केल्यानंतर अखेर मुलाची प्रकृती सुधारली. सध्या तो धोक्याबाहेर असून त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.

या घटनेनंतर डॉक्टरांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. विंचू किंवा साप चावल्यानंतरचा पहिला तास ‘गोल्डन अवर’ मानला जातो. अशा वेळी गावठी उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यात कपडे, बूट, अंथरूण-पांघरूण वापरण्यापूर्वी ते नीट तपासून पाहावे, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!