केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा देशभर परिणाम! संसदेत पुन्हा ‘राष्ट्रीय पुरुष आयोग’ची मागणी; भाजप खासदारांची मोठी भूमिका

नवी दिल्ली : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने आता राष्ट्रीय स्तरावर नवी चर्चा सुरू केली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील भाजप खासदार अशोक कुमार मित्तल यांनी देशात राष्ट्रीय पुरुष आयोग (National Commission for Men) स्थापन करण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी संसदेतील आपल्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत, पुरुषांवरील अत्याचार आणि अन्यायाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले.

मित्तल यांनी सांगितले की, पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांनी आठवण करून दिली की, डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी राज्यसभेत राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापनेसाठी खासगी विधेयक मांडले होते. पुरुषही मानसिक छळ, खोटे आरोप, कौटुंबिक वाद आणि गंभीर गुन्ह्यांचे बळी ठरू शकतात. त्यामुळे त्यांना कायदेशीर मदत, समुपदेशन, तक्रार निवारण आणि संस्थात्मक संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र आयोगाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोहगड परिसरात केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा मोबाईल डेटा, डिजिटल पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

केतन अग्रवाल प्रकरणामुळे एका गुन्ह्याच्या तपासापलीकडे जाऊन पुरुषांच्या हक्क, कायदेशीर संरक्षण आणि स्वतंत्र आयोगाच्या गरजेवर देशभरात पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
