उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; कधी मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज?


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. ताप आणि थकव्यामुळे शुक्रवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिंदे यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून, त्यांना आज (शनिवार) संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पावसाळी अधिवेशन, सततच्या बैठका, दौरे आणि पक्ष संघटनात्मक कामांमुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण होता. पुरेशी विश्रांती न मिळाल्याने त्यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सर्व वैद्यकीय तपासण्या समाधानकारक आल्याने त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात होणारे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तसेच शिवसेनेत होणारा शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पुढे ढकलावा लागला.

यानंतर परिस्थितीचा आढावा घेत शुक्रवारी मध्यरात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले असून, लवकरच ते पुन्हा नियमित कामकाजाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!