45 दिवस बेपत्ता असल्याचं नाटक… अखेर बाथरूमची फरशी फोडताच उघड झालं थरारक रहस्य; पत्नीच निघाली पतीच्या हत्येची सूत्रधार

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले असून, पत्नीनेच पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूमच्या जमिनीखाली पुरल्याचा आरोप आहे. तब्बल 45 दिवस पती बेपत्ता असल्याचे नाटक करत तिने कुटुंबीय आणि पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, नियमित पोलीस पडताळणीदरम्यान तिच्या संशयास्पद वर्तनामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.

मृत सुरेंद्र शर्मा हे पत्नी रूबी शर्मा आणि दोन मुलींसह राहत होते. प्राथमिक तपासानुसार, हत्येच्या दिवशी रूबीने दोन्ही मुलींना नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर पतीला खिरीतून गुंगीचे औषध दिल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी घरातील बाथरूममध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला आणि वरून सिमेंट टाकून नवीन फरशी बसवण्यात आली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
दरम्यान, सुरेंद्र बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. मात्र, एका जुन्या प्रकरणातील पडताळणीसाठी पोलीस घरी पोहोचल्यावर रूबीची उत्तरे विसंगत वाटू लागली. त्यानंतर कुटुंबीयांपुढे झालेल्या चौकशीत तिने मृतदेह बाथरूमखाली असल्याची कबुली दिल्याचे समोर आले.

पोलिसांनी तातडीने फरशी फोडून पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात इतर कोणाची मदत होती का, तसेच बाथरूमचे काम करणाऱ्या मजुरांना या कटाची माहिती होती का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
