‘शेतात सापडला सोन्यानं भरलेला हंडा’, 5 लाखांत दिली 1000 सोन्याची नाणी; तपासणीत समोर आलं धक्कादायक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील चकलांम्बा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ असे आमिष दाखवून एका खासगी वाहनचालकाची तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपीने तक्रारदाराला १ हजार सोन्याची नाणी विकल्याचा दावा केला. मात्र, तपासणीत ती सर्व नाणी बनावट असल्याचे उघड झाले. याप्रकरणी चकलांम्बा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी राजकुमार बापूराव कांबळे (वय ४५) हे खासगी वाहनचालक आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी कामानिमित्त ते पुण्यात गेले असताना त्यांची ओळख मिलिंद अर्जुन निकाळजे (रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याशी झाली होती.

काही दिवसांनी निकाळजे याने कांबळे यांना फोन करून, “माझ्या शेतात सोन्याने भरलेला हंडा सापडला आहे, मात्र ही बाब कोणाला सांगू नकोस,” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्या हंड्यातील एक हजार सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिषही दाखवले.

सुरुवातीला आरोपीने फोनपेद्वारे १२ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर मुख्य व्यवहारासाठी १९ मे २०२६ रोजी कांबळे यांना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे बोलावण्यात आले. तेथे कांबळे यांनी आरोपीला ५ लाख रुपयांची रोख रक्कम दिली. त्याबदल्यात आरोपीने त्यांना एक हजार नाण्यांची पोटली दिली.
नाणी घेऊन उदगीरला परतल्यानंतर कांबळे यांनी ती स्थानिक सराफाकडून तपासून घेतली. त्यावेळी सर्वच नाणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
यानंतर २२ मे रोजी कांबळे हे पैसे परत मागण्यासाठी आरोपीच्या टाकळी अंबड येथील घरी गेले. मात्र, त्यांना पाहताच आरोपी तेथून पसार झाला. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर कांबळे यांनी चकलांम्बा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, विश्वास बसावा म्हणून आरोपीने आधीच एक शक्कल लढवली होती. १६ एप्रिल रोजी त्याने कांबळे यांना मालेगाव येथे बोलावून एक खरे सोन्याचे नाणे नमुना म्हणून दिले होते. दुसऱ्या दिवशी सराफाकडून तपासणी केली असता ते नाणे खरे असल्याचे स्पष्ट झाले. याच एका खऱ्या नाण्याच्या आधारे आरोपीने विश्वास संपादन करत अखेर ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.