पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांसाठी रेड अलर्ट


पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यासह राज्यभरात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. शुक्रवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता, तर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासूनही पुण्यात पावसाची रिपरिप सुरू असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, घाट भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पावसामुळे पुणे जिल्ह्यातील किल्ले, घाट आणि धबधबे प्रवाही झाले असून पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर घाटवाटांवर आणि धबधब्यांच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान सक्रिय असलेली द्रोणीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक प्रभावी होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या दोन्ही हवामान प्रणालींचा परिणाम कोकण आणि पुण्याच्या घाट परिसरावर अधिक प्रमाणात जाणवत असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होत असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील शेतीच्या कामांनाही आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!