कुंजीरवाडीत धक्कादायक घटना; झोपेतून उठवलं म्हणून सहकारी चालकाला चावा, टोकदार वस्तूने वार


लोणी काळभोर : कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जेएसडब्ल्यू कंपनीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला. झोपेतून उठवल्याचा राग मनात धरून एका चालकाने सहकारी चालकाच्या हाताला चावा घेतल्यानंतर टोकदार वस्तूने हल्ला केल्याची घटना ३० जून रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी चालक निशांतकुमार श्रीजयकुमार यादव (वय ४१) हे ग्रीन लाईन ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. ते कुंजीरवाडी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या पार्किंगमध्ये ट्रक (एमएच-१४-केक्यू-४०४७) इतर चालकांसह मुक्कामी थांबले होते. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण विश्रांती घेत असताना आरोपी विनोद कुमार गुप्ता ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता.

काही वेळाने त्याला उठविण्यासाठी निशांतकुमार यादव यांनी हलवले. मात्र, झोपेतून जागे झाल्यानंतर संतापलेल्या विनोद कुमारने यादव यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला आणि मनगटाजवळ चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता ट्रकमध्ये पडलेल्या एका टोकदार वस्तूने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केला.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या निशांतकुमार यादव यांना सहकारी चालक रोहित कुमार यांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी जखमी चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद कुमार गुप्ता याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!