कुंजीरवाडीत एफडीएचा धडक छापा; ‘श्री दत्त टी स्टॉल’वरून ६६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दुकान व गोदाम सीलबंद..


लोणी काळभोर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे गुरुवारी (२ जुलै) रोजी दुपारी धडक कारवाई करत एचपी पेट्रोल पंपासमोरील ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून तब्बल ६६ हजार ४८५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. कारवाईनंतर दुकानासह लगतचे गोदाम सीलबंद करण्यात आले असून विक्रेता आणि पुरवठादाराविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टाव्हरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ प्रकाश माळी (रा. कुंजीरवाडी) आणि आप्पा कांचन (रा. उरुळी कांचन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाला ‘श्री दत्त टी स्टॉल’वर प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. दुकान आणि लगतच्या गोदामातून विमल, रजनीगंधा, डायरेक्टर स्पेशल, आरएमडी, मिराज, व्ही-१ तंबाखू आणि एम सेंटेड टोबॅको यांसह विविध ब्रँडचा मोठा साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत उर्वरित संपूर्ण माल जप्त करून एफडीएच्या गोदामात जमा केला.

जप्त केलेल्या मालामध्ये ६३३ विमल पानमसाला पाऊच, ४५० डायरेक्टर स्पेशल पानमसाला पाऊच, १५ बॉक्स मिराज सुगंधित तंबाखू, १३ बॉक्स रजनीगंधा पानमसाला, एक बॉक्स आरएमडी पानमसाला, १४७ व्ही-१ तंबाखू पाकिटे आणि एक बॉक्स एम सेंटेड टोबॅको असा एकूण ६६ हजार ४८५ रुपयांचा साठा होता.
तपासादरम्यान दुकान चालक गोकुळ माळी याने हा प्रतिबंधित माल आप्पा कांचन यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली.

मात्र, मालाच्या खरेदीची कोणतीही वैध बिले किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सोनकांबळे, लोणी काळभोर पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

एफडीएने याप्रकरणी केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादकांपर्यंत संपूर्ण साखळीचा तपास केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईमुळे लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात आणखी कठोर कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!