पुण्यातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी! प्राथमिक शाळांची वेळ बदलली; जाणून घ्या नवे वेळापत्रक

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेच्या तसेच खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून, हे नवे वेळापत्रक १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सर्व प्राथमिक शाळा सकाळी ७.०० ते दुपारी १२.१५ या वेळेत भरवल्या जाणार आहेत. हा निर्णय मनपा शाळांसह शहरातील सर्व खासगी प्राथमिक शाळांसाठी लागू असणार आहे.
वेळेत बदल का करण्यात आला?
भारत निवडणूक आयोगाकडून सध्या ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या कामासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्राथमिक शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.१५ या वेळेतच भरतील. त्यामुळे पालकांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
