शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा; आता रात्रीच्या वीजेचा ताण कायमचा संपणार


मुंबई: महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यातील सुमारे 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, यंदाच्या वर्षाअखेरीस 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल. सुरुवातीला आठ तास दिवसा वीज देण्यात येईल आणि पुढील टप्प्यात हा कालावधी 12 तासांपर्यंत वाढवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या बियाण्यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र (सर्टिफिकेशन) अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे बनावट बियाण्यांवर आळा बसून शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

याशिवाय, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी विशेष AI अॅप विकसित केल्याची माहिती त्यांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा खर्च कमी होण्यास आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

पुढील काळात पशुसंवर्धन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील बदलत्या हवामानानुसार शेतीच्या नव्या पद्धती विकसित करण्यावर सरकार काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा, बनावट बियाण्यांवर नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे राज्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!